facebook


डेंग्यूच्या तापावरील औषधे: उपचार, टाळावयाच्या गोळ्या आणि बरे होण्यासाठी मार्गदर्शक

Medicine for Dengue Fever Medicine for Dengue Fever

डेंग्यूचा ताप हा डासांमुळे पसरणारा एक सामान्य विषाणूजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने मादी एडिस डासाच्या चाव्यामुळे पसरतो. पूर्वी डेंग्यूचा प्रादुर्भाव ठरावीक ऋतूमध्ये अधिक दिसून येत असे; मात्र आता वर्षभरात कोणत्याही वेळी हा आजार होऊ शकतो.

डेंग्यूची लागण झाल्यास खूप ताप येणे, अंगात तीव्र वेदना होणे, डोके दुखणे आणि अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसू शकतात. योग्य काळजी घेतल्यास बहुतेक रुग्ण बरे होतात. मात्र, गंभीर गुंतागुंत निर्माण झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असते.

डेंग्यूच्या विषाणूचा थेट नाश करणारे विशिष्ट औषध उपलब्ध नाही. या आजारात योग्य काळजी घेणे आणि लक्षणांनुसार उपचार करणे महत्त्वाचे असते. औषधांमुळे ताप, वेदना आणि इतर त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

डेंग्यूमध्ये ताप, स्नायू दुखणे आणि डोकेदुखी यांसारख्या त्रासांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पॅरासिटामॉल हे औषध सामान्यतः वापरले जाते.

या लेखात आपण डेंग्यूचा ताप, त्यावरील उपचारपद्धती, कोणती औषधे वापरली जातात आणि कोणती औषधे टाळावीत याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

डेंग्यूचा ताप म्हणजे काय?

डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तो प्रामुख्याने मादी एडिस इजिप्ती डास चावल्यामुळे माणसांमध्ये पसरतो. 

हे डास सहसा साचलेल्या स्वच्छ पाण्यात पैदास करतात. ते दिवसा, विशेषतः सकाळी आणि दुपारी, अधिक सक्रिय असतात आणि चावल्यामुळे डेंग्यूचा प्रसार होऊ शकतो.

डेंग्यूमधून बरे होण्यासाठी साधारणपणे एक ते दोन आठवडे लागू शकतात. मात्र, त्यानंतरही अशक्तपणा बराच काळ टिकू शकतो. औषधांमुळे डेंग्यूचा विषाणू थेट नष्ट होत नसला, तरी काही औषधे या आजाराशी संबंधित लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

डेंग्यूच्या तापाची सामान्य लक्षणे

डेंग्यू झालेल्या डासाने चावल्यानंतर साधारणपणे चार ते दहा दिवसांत लक्षणे दिसू लागतात. डेंग्यूच्या तापामध्ये सामान्यतः पुढील लक्षणे आढळतात:

  • खूप ताप येणे, कधीकधी तापमान १०४ अंश फॅरेनहाइट (४० अंश सेल्सिअस) पर्यंत पोहोचणे
  • तीव्र डोकेदुखी होणे आणि डोळ्यांच्या मागे वेदना जाणवणे
  • स्नायू, सांधे आणि संपूर्ण अंग दुखणे
  • मळमळ होणे आणि उलट्या होणे
  • त्वचेवर पुरळ येणे
  • अशक्तपणा आणि थकवा जाणवणे
  • भूक मंदावणे
  • पोटात तीव्र वेदना होणे किंवा उलट्या होणे (गंभीर डेंग्यूची लक्षणे)

डेंग्यूच्या तापावरील उपचारांसाठी वापरली जाणारी औषधे

डेंग्यूचा ताप आणि त्यासोबत दिसणारी लक्षणे कमी करण्यासाठी लक्षणांनुसार उपचार करणारी औषधे वापरली जातात. मानवी शरीरातील डेंग्यूच्या विषाणूचा नाश करणारे विशिष्ट औषध उपलब्ध नसल्यामुळे उपचारांचा मुख्य उद्देश रुग्णाला आराम मिळवून देणे हा असतो.

डेंग्यूची लक्षणे कमी करण्यासाठी किंवा त्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढील औषधे आणि उपचारपद्धती वापरल्या जाऊ शकतात. 

औषध किंवा उपचारपद्धती

उपयोग

पॅरासिटामॉल

ताप आणि अंगदुखी कमी करण्यास मदत करते.

तोंडावाटे द्रवपदार्थ आणि क्षारांचे द्रावण

घाम येणे किंवा उलट्या होणे यांमुळे शरीरातून कमी झालेले पाणी आणि आवश्यक क्षार भरून काढण्यास मदत करते.

शिरेतून दिले जाणारे द्रवपदार्थ

तोंडावाटे पुरेसे द्रवपदार्थ घेता येत नसल्यास किंवा गुंतागुंत निर्माण झाल्यास रुग्णालयात हे द्रवपदार्थ दिले जातात.

डेंग्यूच्या तापात पॅरासिटामॉलचा वापर: सुरक्षितता आणि उपचार

डेंग्यूच्या विषाणूजन्य संसर्गात वाढलेले तापमान आणि अंगदुखी कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल हे औषध सर्वाधिक वापरले जाते. हे औषध डेंग्यूच्या विषाणूचा नाश करत नाही, परंतु आजारामुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत करते.

डेंग्यूच्या तापासाठी पॅरासिटामॉल घेताना पुढील काळजी घ्यावी:

  • डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणात आणि योग्य वेळी औषध घ्यावे.
  • पॅरासिटामॉल असलेली एकापेक्षा अधिक औषधे एकाच वेळी घेऊ नयेत.
  • पॅरासिटामॉलचे प्रमाण वय आणि वजनानुसार ठरते. त्यामुळे मुलांना हे औषध देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत. ताप कमी होत नसल्यास किंवा लक्षणे अधिक गंभीर होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.

डेंग्यूच्या उपचारांसाठी उपयुक्त गोळ्या आणि इतर उत्पादने

डेंग्यूमधून बरे होताना शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे आणि ताप नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे असते. शरीरातील कमी झालेले पाणी आणि आवश्यक क्षार भरून काढण्यासाठी तोंडावाटे घ्यायचे क्षारमिश्रित द्रावण उपयोगी ठरते. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेले पॅरासिटामॉल ताप आणि अंगदुखी कमी करण्यास मदत करू शकते.

झीलॅब क्षारमिश्रित द्रावणाची पूड

डेंग्यूमधून बरे होताना घाम येणे किंवा उलट्या होणे यांमुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार कमी होऊ शकतात. झीलॅबची ही पूड पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षारांची कमतरता भरून काढण्यास मदत करते.

  • घटक: सोडियम क्लोराइड (२.६ ग्रॅम) + पोटॅशियम क्लोराइड (१.५ ग्रॅम) + सोडियम सायट्रेट (२.९ ग्रॅम) + डेक्स्ट्रोज (१३.५ ग्रॅम)
  • फायदे: शरीरातील कमी झालेले पाणी आणि आवश्यक क्षार भरून काढण्यास तसेच शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यास मदत करते.

पॅराझेक्स एक्सटी गोळी

पॅराझेक्स एक्सटी गोळीमध्ये ६५० मिग्रॅ पॅरासिटामॉल असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध ताप कमी करण्यासाठी तसेच डेंग्यूमुळे होणारी अंगदुखी आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

  • घटक: पॅरासिटामॉल (६५० मिग्रॅ)
  • फायदे: ताप कमी करण्यास आणि सौम्य ते मध्यम स्वरूपाच्या वेदना कमी करण्यास मदत करते.

डेंग्यूच्या तापात कोणती औषधे टाळावीत?

आयबुप्रोफेन, ॲस्पिरिन यांसारखी वेदनाशामक औषधे सामान्य तापावरील औषधे म्हणून वापरली जातात. मात्र, डेंग्यूचा ताप हा सामान्य तापासारखा नसतो. या औषधांमुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे डेंग्यूचा संशय असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेऊ नयेत.

औषधाचे नाव

टाळण्याचे कारण

ॲस्पिरिन

रक्तातील रक्तपटलिकांच्या कार्यावर परिणाम होऊन रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.

आयबुप्रोफेन

रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो आणि पोटाशी संबंधित त्रास उद्भवू शकतात.

डायक्लोफेनॅक

हे दाह कमी करणारे वेदनाशामक औषध असून त्यामुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.

नॅप्रोक्सेन

या औषधामुळे रक्तस्रावाशी संबंधित गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असल्याने ते टाळावे.

डेंग्यूचा ताप टाळण्याचे उपाय

डेंग्यूचा संसर्ग टाळण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे हा आजार पसरवणाऱ्या मादी एडिस डासांची पैदास रोखणे. या डासांची वाढ नियंत्रित केल्यास डेंग्यूचा प्रसार होण्याचा धोकाही कमी करता येतो.  

  • हवेच्या थंडाव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांमधील, फुलांच्या कुंड्यांमधील, बादल्यांमधील आणि इतर भांड्यांमधील साचलेले पाणी रिकामे करून ती स्वच्छ करावीत.
  • डासांना दूर ठेवणाऱ्या पदार्थांचा वापर त्यांच्या आवरणावरील सूचनांनुसार करावा.
  • डास चावू नयेत म्हणून पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पाय झाकणारी वस्त्रे घालावीत.
  • खिडक्यांना जाळ्या लावाव्यात आणि झोपताना मच्छरदाणी वापरावी.

डेंग्यूमध्ये घरी घ्यावयाची अतिरिक्त काळजी

डेंग्यू टाळण्यासाठी योग्य उपाय करण्यासोबतच, या आजारातून लवकर बरे होण्यासाठी घरच्या घरी काही सोप्या गोष्टींची काळजी घ्यावी. 

  • शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी, तोंडावाटे घ्यायचे क्षारमिश्रित द्रावण आणि इतर योग्य द्रवपदार्थ प्यावेत.
  • शरीर पूर्णपणे बरे होईपर्यंत जास्त शारीरिक श्रम टाळावेत आणि पुरेशी विश्रांती घ्यावी.
  • डेंग्यूच्या तापात सहज पचणारा आणि पोषक आहार घ्यावा. यामध्ये खिचडी, डाळ, भात, केळी आणि सूप यांचा समावेश करता येतो. 
  • ताप उतरला म्हणजे आजार पूर्णपणे बरा होत आहे, असे समजू नये.
  • डास दूर ठेवणारे पदार्थ, शरीर झाकणारे कपडे आणि मच्छरदाणी वापरून डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करावे.

डेंग्यूच्या रुग्णाला रुग्णालयात कधी दाखल करावे?

डेंग्यूची तीव्रता झपाट्याने वाढू शकते आणि गंभीर परिस्थितीत जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पुढीलपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी:

  • पोटात तीव्र वेदना होणे किंवा पोट दाबल्यावर खूप दुखणे.
  • वारंवार उलट्या होणे किंवा पोटात द्रवपदार्थ टिकून न राहणे.
  • नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्त येणे.
  • मलामध्ये किंवा उलटीमध्ये रक्त दिसणे.
  • श्वास घेण्यास त्रास होणे किंवा वेगाने श्वास चालणे.
  • अतिशय अशक्तपणा जाणवणे, अस्वस्थता वाढणे किंवा गोंधळल्यासारखे होणे.
  • त्वचा थंड, फिकट किंवा चिकट होणे.
  • लघवीचे प्रमाण खूप कमी होणे.

निष्कर्ष

डेंग्यूचा ताप टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लक्षणांकडे लक्ष देणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणे आवश्यक आहे. डेंग्यूच्या तापावरील औषधाचा विचार करताना, सौम्य लक्षणांमध्ये पॅरासिटामॉलचा वापर अनेकदा केला जातो. हे औषध ताप आणि अंगदुखी कमी करण्यास मदत करू शकते. 

रक्तस्रावाचा धोका वाढू शकत असल्यामुळे ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक आणि नॅप्रोक्सेन ही औषधे टाळावीत. स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नयेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ताप उतरला तरी धोक्याची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

Frequently Asked Questions (FAQs)

Q1. डेंग्यूच्या तापावर उपचार करण्यासाठी कोणती औषधे उपयोगी ठरू शकतात?

Ans.डेंग्यूच्या तापासोबत होणारा अंगदुखीचा आणि डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी पॅरासिटामॉल हे औषध सर्वाधिक वापरले जाते. मात्र, हे औषध शरीरातील डेंग्यूच्या विषाणूचा थेट नाश करत नाही. हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.

Q2. डेंग्यूचे निदान कसे केले जाते?

Ans.डेंग्यूचे निदान करण्यासाठी रुग्णाची लक्षणे, पूर्वीचा आजारांचा इतिहास आणि रक्ताच्या तपासण्या विचारात घेतल्या जातात. आजाराला किती दिवस झाले आहेत, यानुसार डॉक्टर एनएस१ प्रतिजन, आरटी-पीसीआर किंवा प्रतिपिंड तपासणी करण्याचा सल्ला देऊ शकतात.

Q3. डेंग्यूमध्ये सामान्यतः किती ताप येतो?

Ans.डेंग्यूमध्ये साधारणपणे १०२ ते १०४ अंश फॅरेनहाइट (३८.९ ते ४० अंश सेल्सिअस) ताप येऊ शकतो. मात्र, केवळ तापमानावरून डेंग्यूचे निदान करता येत नाही किंवा आजाराची तीव्रता ठरवता येत नाही.

Q4. डेंग्यूचा ताप कसा बरा करावा?

Ans.डेंग्यूमधून बरे होण्यासाठी पुरेसे द्रवपदार्थ पिणे, विश्रांती घेणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पॅरासिटामॉल घेणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. धोक्याची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्यावेत. पॅरासिटामॉलसारखी औषधे ताप आणि अंगदुखी यांसारखी लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

Q5. डेंग्यूच्या तापात पॅरासिटामॉल घेता येते का?

Ans.होय, डेंग्यूमुळे होणारा ताप आणि वेदना कमी करण्यासाठी पॅरासिटामॉलला सामान्यतः प्राधान्य दिले जाते. मात्र, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणातच हे औषध घ्यावे. जास्त प्रमाणात घेतल्यास यकृताला इजा होऊ शकते.

Q6. डेंग्यूच्या तापात कोणती औषधे टाळावीत?

Ans.डेंग्यूमध्ये ॲस्पिरिन, आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक आणि नॅप्रोक्सेन ही औषधे टाळावीत, कारण त्यांमुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो. वेदना कमी करणारे कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Q7. डेंग्यूच्या उपचारांसाठी प्रतिजैविके घेता येतात का?

Ans.नाही, डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा आजार असल्यामुळे प्रतिजैविके डेंग्यूवर थेट परिणाम करत नाहीत. मात्र, सोबत जिवाणूंचा संसर्ग झाल्याचा संशय असल्यास किंवा त्याची पुष्टी झाल्यास डॉक्टर प्रतिजैविके देऊ शकतात.

Q8. डेंग्यूचा प्रसार कसा रोखता येतो?

Ans.डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी साचलेले पाणी काढून टाकावे, डासांना दूर ठेवणाऱ्या पदार्थांचा वापर करावा, शरीर झाकणारे कपडे घालावेत आणि खिडक्यांना जाळ्या लावाव्यात. डेंग्यू झालेल्या रुग्णाला डास चावणार नाहीत याची काळजी घेतल्यास पुढील प्रसाराचा धोका कमी करता येतो.

Q9. डेंग्यूवर घरी उपचार करता येतात का?

Ans.सौम्य डेंग्यूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुरेसे द्रवपदार्थ घेऊन, विश्रांती घेऊन आणि नियमित तपासणी करून घरी काळजी घेता येऊ शकते. मात्र, धोक्याची लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

Q10. डेंग्यूचा ताप किती दिवस टिकतो?

Ans.डेंग्यूचा ताप सामान्यतः दोन ते सात दिवस टिकतो. पूर्णपणे बरे होण्यासाठी एक ते दोन आठवडे लागू शकतात. मात्र, अशक्तपणा आणि थकवा काही आठवडे टिकू शकतो.

Q11. प्रौढांमध्ये डेंग्यूची गंभीर लक्षणे कोणती आहेत?

Ans.पोटात तीव्र वेदना होणे, सतत उलट्या होणे, रक्तस्राव होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, गोंधळल्यासारखे होणे, अतिशय अशक्तपणा जाणवणे आणि लघवीचे प्रमाण कमी होणे ही डेंग्यूची गंभीर लक्षणे आहेत. यांपैकी कोणतेही लक्षण दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

Recent Blogs


Disclaimer : Zeelab Pharmacy provides health information for knowledge only. Do not self-medicate. Always consult a qualified doctor before starting, stopping, or changing any medicine or treatment.


medicine cart

₹ 0

0

Items added


2026 Copyright By © Zeelab Pharmacy Private Limited. All Rights Reserved

Our Payment Partners

card
correct iconAdded!